छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये जून महिन्यात आतापर्यंत सरासरी केवळ १४ मिमी पाऊस झाला आहे. पुर्ण मराठवाड्यात पावसात ८५ टक्के घट झाली आहे. पावसाच्या तुटवड्यामुळे खरीप पिकांवर परिणाम झाला आहे. २० जूनपर्यंत मराठवाड्यात शून्य टक्के पेरणी झाली आहे.
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत उस्मानाबादमध्ये जून महिन्यात केवळ ५ मिनी पाऊस नोंदवला गेला आहे. आणि सर्वाधिक ९४ टक्क्यांची तूट दिसून आली आहे. जालनामध्ये (८ मिमी) ९१ टक्के पाऊस कमी झाला आहे. त्यापाठोपाठ नांदेडमध्ये ११ मिमी पाऊस (९० टक्के कमी), हिंगोलीमध्ये १५ मिमी पाऊस (८८ टक्के कमी), बीडमध्ये १२ मिमी पाऊस (८६ टक्के कमी), लातूरमध्ये १६ मिमी पाऊस (८३ टक्के कमी) पाऊस झाला आहे. परभणीत १९ मिमी पाऊस (८२ टक्के तुट) आणि औरंगाबादमध्ये २१ मिमी पाऊस (७६ टक्के कमी) झाला आहे.
मराठवाड्यात लातूर कृषी विभागात २९.३५ लाख हेक्टर खरीफ शेती आहे. तर औरंगाबाद विभागात २१.८७ लाख हेक्टरमध्ये खरीप पिके घेतली जातात. शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते जयाजी सूर्यवंशी म्हणाले की, खरीप पेरणीस उशीर झाल्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे. मराठवाड्यात कापूस आणि ऊस ही दोन नकदी पिके घेतली जातात. लातूर विभागात डाळवर्गीय पिकांचे उत्पादन होते. मान्सूनला उशीर झाल्याचा परिणाम शेतीवर सर्वाधिक होणार आहे.
शहरातील एपीजे अब्दुल कलाम अॅस्ट्रोस्पेस सायन्स सेंटर अँड क्लबचे संचालक श्रीनिवास औंधकर म्हणाले की, मान्सून रखडला असला तरी पुढील दोन ते तीन दिवसात गती घेऊ शकतो.
दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने जारी केलेल्या पुर्वानुमानानुसार, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड आणि हिंगोलीत हलका तर नांदेड, लातूर. उस्मानाबादमध्ये मध्यम पाऊस कोसळेल.