नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीसह देशातील बहुतांश भागात मान्सूनने हजेरी लावली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमध्ये हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातही मान्सून सर्वत्र पसरला आहे. गेल्या दोन दिवसात अनेक जिल्ह्यांत पाऊस झाला आहे. हवामान विभागाने मुंबई, पुण्यात यलो अलर्ट दिला आहे. २९ व ३० जून रोजी महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता आहे.
नवभारत टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, उत्तराखंड हवामान विभागाने राज्याच्या डोंगराळ भागात पुढील चार दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे. डोंगराळ जिल्हे व मैदानी जिल्ह्यात यलो व ऑरेंज अलर्ट असेल. दक्षिण पश्चिम मान्सून गुजरातमध्ये पोहोचला असून पुढील पाच दिवस या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने ही माहिती दिली आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, दक्षिण गुजरातमधील नवसारी आणि वलसाड जिल्ह्यात तीन दिवस पाऊस कोसळू शकतो. या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सरकारने म्हटले आहे की, आपत्त्कालीन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. दक्षिण गुजरातच्या नवसारी व वलसाड जिल्ह्यात तसेच दमण, दादरा नगर हवेलीत रेड अलर्ट लागू करण्यात आला आहे.