आयकर विभागाने इन्कमटॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै अशी दिली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा इन्कमटॅक्स भरण्याचा १ कोटीचा आकडा १२ दिवस आधीच पोहोचला आहे असे विभागाने म्हटले आहे. करदात्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नये आणि त्यांनी शक्य तितक्या लवकर विवरणपत्र भरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
एबीपी लाईव्हमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, अनेकजण वेळेवर आयटीआर भरत नाहीत. निर्धारित वेळेत रिटर्न न भरणे ही मोठी समस्या आहे. यासाठी अखेरची तारीख ३१ जुलै आहे. वेळेत आयटीआर न भरल्यास ५००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. अनेकदा लोक चुकीचा फॉर्म निवडतात. त्यामुळे आयटीआर भरला जात नाही. आयकर रिटर्न भरताना तुम्ही तुमच्या बँक खात्याची पडताळणी करणे गरजेचे आहे. आयकर विभागाकडून नोटीस पाठवल्यावर बहुतेकजण आयकर पडताळणी करून घेणे विसरतात. सध्या आयटीआर पडताळणीसाठी ३० दिवसांचा कालावधी आहे.
अनेकदा लोक त्यांच्या आयकर रिटर्नमध्ये वैयक्तिक माहिती देताना चुका करतात. मात्र, वैयक्तिक माहिती योग्यरित्या भरणे गरजेचे आहे. आर्थिक वर्षानंतरचे वर्ष मूल्यांकन वर्षात निवडले पाहिजे. त्याशिवाय उत्पन्नाचे सर्व सोर्स कळवणे गरजेचे असते. या बाबी लक्षात ठेवाव्यात असे आवाहन आयकर विभागाकडून करण्यात आले आहे.