नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षात परदेशी बाजारात भारतीय कमोडिटीला मागणी खूप वाढली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात, एप्रिलमध्ये फळे, भाजीपाल्यापासून धान्यापर्यंत सर्व गोष्टींच्या निर्यातीला चांगली संधी मिळाली. काही गोष्टींची निर्यात मात्र अतिशय कमी झाली. यामध्ये निर्बंध लागू असलेल्या गव्हाचा समावेश आहे.
बिझनेस स्टँडर्डमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, वर्ष २०२३-२४ मधील एप्रिल महिन्यात १८,४१० कोटी रुपयांच्या कमोडिटीची निर्यात झाली आहे. गेल्यावर्षी समान कालावधीतील १८,७१८ कोटी रुपयांच्या तुलनेत ही निर्यात ३ टक्के कमी आहे. यंदा ४ कोटी रुपये किमतीच्या १,६३१ टन गव्हाची निर्यात झाली. तर गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात ३६०२ कोटी रुपयांच्या १४.७२ लाख टन गव्हाची निर्यात झाली होती. जर गव्हाची निर्यात वगळली तर एकूण निर्यातीत २० टक्क्यांची वाढ दिसून येते.
एप्रिल महिन्यात ३,८५५ कोटी रुपये किमतीच्या ४,२४,६५० टन बासमती तांदळाची निर्यात झाली आहे. गेल्यावर्षीच्या, एप्रिल महिन्यातील २,४६९ कोटी रुपयांच्या ३,१९.८६४ टन बासमती तांदळाच्या तुलनेत ही निर्यात ५६ टक्के अधिक आहे. नॉन बासमती तांदळाच्या निर्यातीत १८ टक्क्यांची वाढ दिसून आली. एप्रिलमध्ये ४,३४९ कोटी रुपये मूल्याच्या १३,५२,८६५ टन नॉन बासमती तांदळाची निर्यात झाली आहे.