मुंबई : मुंबईसह पूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या वर्षी मान्सूनने जवळपास १५ दिवस उशीरा राज्यात प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या विविध भागात झालेल्या जोरदार पावसाने अडचणी दूर झाल्या आहेत. मात्र, राज्यात अद्याप शेतांमध्ये पेरणीसाठी पुरेसा पाऊस झालेला नाही. यादरम्यान, पुणे हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख के. एस. होसळीकर यांनी ट्वीट करून चांगली माहिती दिली आहे. आगामी पाच दिवस महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
नवभारत टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पुढील पाच दिवस राज्यात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. २ जुलैपासून पावसाचा नवा टप्पा सुरू होईल. याचा परिणाम दक्षिण भारताचा काही भाग आणि परिसरावर पडण्याची शक्यता आहे. राज्यात चौथ्या आणि पाचव्या दिवशीही पावसाचा परिणाम दिसून येईल. जुलैच्या पहिल्या पाच दिवसात जोरदार पावसाची शक्यता आहे.
यादरम्यान, मुंबई आणि उपनगरात शुक्रवारी सकाळपासून पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचा इशारा दिला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम पाऊस कोसळेल. पुढील तीन दिवस सक्रीय मान्सूनमुळे कोंकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये तर मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.