अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने, बुधवार, 5 जुलै 2023 रोजी नवी दिल्ली येथे ‘अन्नपुरवठा मंत्र्यांची राष्ट्रीय परिषद’ आयोजित केली आहे. खरीप विपणन हंगाम (KMS) 2023-24 दरम्यान भरडधान्य खरेदीसाठी कृती आराखडा विकसित करणे, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या (PMGKAY) प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारने हाती घेतलेल्या प्रमुख उपक्रमांवर चर्चा करणे, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या सर्वोत्तम पद्धतींचा प्रसार आणि त्याचे बळकटीकरण करणे, अन्न आणि पोषणमूल्य सुरक्षेवर लक्ष केंद्रित करणे हे या या परिषदेचे उद्दिष्ट आहे.
केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, वाणिज्य आणि उद्योग तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल या परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवतील. या परिषदेला केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री, साध्वी निरंजन ज्योती आणि अश्विनी कुमार चौबे तसेच राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री देखील उपस्थित राहतील.
परिषदेत शुगर-इथेनॉल पोर्टलचा पियुष गोयल यांच्या हस्ते होणारा प्रारंभ प्रमुख वैशिष्ट्य आहे. चर्चेसाठी इतर प्रमुख मुद्द्यांमध्ये SMART-PDS ची अंमलबजावणी, पुरवठा साखळी उत्तम करणे, खरेदी केंद्रांचे मानकीकरण आणि रास्त भाव दुकानांचे (FPSs) परिवर्तन यांचा समावेश आहे.
देशातील अन्न आणि पोषणमूल्य सुरक्षा परिसंस्थेतील परिवर्तन साध्य करणे आणि 2023-24 करता पथदर्शक आराखडा तयार करण्यासाठी आव्हाने आणि संधींवर विचार करण्याकरता ही परिषद एक व्यासपीठ म्हणून काम करेल.
अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने गेल्या 9 वर्षांत समाजातील गरीब आणि मागास घटकांना लक्ष्यित आणि वेळेवर अन्नधान्य वितरण सुनिश्चित करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. 1 जानेवारी 2023 पासून प्रमुख योजना असलेल्या, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला (PMGKAY) कायम ठेवत अंमलबजावणी सुरु ठेवल्याने जवळपास 80 कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्याची तरतूद करणे शक्य झाले आहे. या योजनेची सुरुवात 2016 मधे आली होती.
या महत्त्वपूर्ण उपाययोजनांद्वारे, लक्ष्यित सार्वजनिक वितरण प्रणाली (TPDS) मजबूत करण्यात आली असून त्याची कार्यक्षमता वाढली आहे. प्रणालीतील प्रगती आणि सुधारणा टिकवून ठेवण्यासाठी, प्रणालीची कार्यक्षमता वाढवणे आणि अन्न तसेच पोषणमूल्य सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी नवीन उपक्रम सुरू करण्याची योजना विभाग आखत आहे.
या परिषदेत देशभरातील राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील अन्नपुरवठा मंत्री आणि अन्नपुरवठा सचिव उपस्थित राहतील. तसेच अन्न आणि नागरी पुरवठा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीलाही प्रोत्साहन दिले जाईल.
भरडधान्य खरेदी, खरेदी केंद्रांचे मानकीकरण, PMGKAY ची प्रभावी अंमलबजावणी, SMART – PDS ची अंमलबजावणी, शुगर-इथेनॉल पोर्टलचा प्रारंभ, केन्द्रीय मंत्र्यांच्या हस्ते 9 वर्षांच्या कामगिरीची पुस्तिका प्रकाशित करणे, तांदळास पोषणयुक्त बनवणे, यासह इतर विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणे आणि धोरण आखणे हे या महत्त्वपूर्ण परिषदेचे उद्दिष्ट आहे.
ही परिषद अन्न आणि नागरी पुरवठा क्षेत्राच्या कार्यान्वयनात सुधारणा करण्यासाठी कल्पना, अंतर्दृष्टी आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्याची सहभागी होणाऱ्या सर्वांना संधी देईल.