मुंबई : महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आतापर्यंत जोरदार पाऊस झाला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगढ, कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात अपेक्षेनुसार पाऊस सुरू आहे. आज, ६ जुलै रोजी भारतीय हवामान शास्त्र विभागाने (आयएमडी) राज्याच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. खास करुन रत्नागिरी आणि रायगडसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.
टीव्ही९मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, हवामान विभागाने पुढील ३-४ दिवसांसाठी कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये अती मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. प्रशासनाकडून सर्वसामान्य नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापूरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याचबरोबरच सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिकमध्येही ऑरेंज अलर्ट आहे. विदर्भातील वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट असेल. मराठवडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट असेल.
याबाबत भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या पुणे शाखेचे प्रमुख कृष्णानंद होसळीकर यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. राज्यात ठिकठिकाणी पुढील ३-४ दिवसांपर्यंत जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नाशिक, पालघर, ठाणे, वर्धा, गोंदिया, नागपूरमध्ये पुढील काही दिवस पावसाचा जोर असेल. त्यामुळे घरातून बाहेर पडताना भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेला इशारा लक्षात ठेवावा असे त्यांनी म्हटले आहे.