पुणे : सहकार खात्याचे पुणे विभागीय सहनिबंधक डॉ. संजयकुमार भोसले यांची साखर संचालकपदी (प्रशासन) पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली. राज्य सरकारच्या पणन व वस्त्रोद्योग विभागाने ५ जुलै २०२३ रोजी डॉ. भोसले यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला. डॉ. भोसले हे पुणे विभागीय सहनिबंधक पदावर (गट अ) कार्यरत होते. त्यांची अपर निबंधक (सहकारी संस्था) पदी पदोन्नती करण्यात येऊन त्यांची साखर संचालकपदी बदली करण्यात आली. उत्तम इंदलकर यांच्या निवृतीमुळे हे पद रिक्त झाले होते.
डॉ. संजयकुमार श्रीमंतराव भोसले (वय ५४) हे बी.ए.एम.एस., एम.ए. (राज्यशास्त्र) आहेत. डॉ. भोसले यांनी साखर उद्योगात काम करत असताना इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रामसाठी राष्ट्रीय पातळीवरील समितीमध्ये काम केले आहे. महिला बचत गटांच्या निर्मितीबरोबरच ३३ हजार महिलांचे संगठन त्यांनी केले आहे. इतकेच नव्हे तर महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन, महिला बचत गटांची जिल्हास्तरीय आरोग्य विमा सहकारी संस्था स्थापन करून तब्बल १० हजार कुटुंबाना आरोग्य विम्याचे लाभ मिळवून दिले आहेत.