मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता असून, खुद्द राज्य निवडणूक आयोगानेच तसे संकेत दिले आहेत. राज्यात 26 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषद आणि 207 नगरपालिका, पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भात परिपत्रक जारी करून मतदार यादीबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या राजपत्रात नमूद केले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी अधिसूचित केले जात आहे. त्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ त्यांची मुदत संपल्यानंतर कमाल सहा महिन्यांपर्यंत वाढवता येऊ शकतो. त्यानंतर निवडणुका होणे आवश्यक आहे, मात्र गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपालिकांच्या निवडणुका लांबल्या आहेत. प्रशासकांच्या हाती स्थानिक स्वराज्य संस्थाचे प्रशासन आहे.