मुरादाबाद : उसाच्या शेतीने शेतकऱ्यांच्या जीवनात गोडवा वाढला आहे. उसावर पूर, वादळ अशा संकटांचा फारसा परिणाम होत नाही. मोकाट जनावरांकडून पिकाचे फारसे नुकसान होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अनावश्यक नुकसान सोसावे लागत नाही. याचबरोबर योगी आदित्यनाथ सरकारने शेतकऱ्यांना तातडीने ऊस बिले मिळावीत यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना एकरकमी पैसे मिळत आहेत.
‘अमर उजाला’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सद्यस्थितीत मुरादाबाद विभागात उसाचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. विभागात यावर्षी ऊसाचे लागवड क्षेत्र २५,०४६ हेक्टरने वाढल्याचे दिसले. मुरादाबाद विभागातील पाचही जिल्ह्यांत साडेपाच लाख ऊस उत्पादक शेतकरी आहेत. विभागात प्रती हेक्टर ८२३.९० क्विंटल ऊस उत्पादन होते. सर्वाधिक ८८५.५२ क्विंटल प्रती हेक्टर उत्पादन बिजनौरमध्ये मिळते.
विभागात २२ साखर कारखाने आहेत. त्यांचे अधिकारी आणि ऊस विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऊस सर्व्हे पूर्ण केला आहे. थकीत ऊस बिलाचा प्रश्न असतानाही शेतकऱ्यांनी याच पिकाला प्राधान्य दिल्याचे त्यातून दिसून आले आहे. आता बिले देण्याच्या प्रक्रियेतही सुधारणा झाली आहे.
एकाच लागणीत तीन वर्षे पिकाचे उत्पादन घेता येते, शेतकऱ्यांना कमी जोखीम घ्यावी लागते, या नकदी पिकापासून एकरकमी उत्पन्न मिळते तसेच ऊस तोडणीनंतर इतर पिकेही शेतकरी घेऊ शकतात. मुग, उडीद, गहू, टोमॅटो, मोहरी अशी आंतरपिके घेतली जातात. मोकाट जनावरांकडून इतर पिकांचे नुकसान केले जाते. त्यामुळे शेतकरी ऊस पिकाकडे आकर्षीत होत आहे असे शेतकरी ऋषीपाल सिंह यांनी सांगितले. तर एकरकमी पैसे मिळत असल्याने शेतकरी या पिकाला प्राधान्य देत आहेत असे सतवीर सिंह यांनी सांगितले. सरकारच्या प्रयत्नांमुळे ऊस बिले मिळण्याच्या कालावधीत चांगली सुधारणा झाली आहे असे लवी चौधरी यांनी सांगितले.
दरम्यान, मुरादाबादचे ऊस उपायुक्त हरपाल सिंह यांनी सांगितले की, ऊसाचे लागवड क्षेत्र वाढण्याची अनेक कारणे आहेत. या पिकाबाबत शेतकऱ्यांना कमी जोखीम आहे. विभागातील २२ कारखान्यांपैकी १० कारखान्यांनी शंभर टक्के बिले अदा केली आहेत. उर्वरीत कारखान्यांकडूनही पैसे मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे उपायुक्तांनी स्पष्ट केले.