अहमदनगर : एक ऑगस्टला पारनेर साखर कारखान्याचा ताबा घेण्याचा ठराव कारखाना बचाव व पुनरुज्जीवन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. देवीभोयरे येथे समितीची बैठक झाली. साखर कारखान्याच्या जमीन हस्तांतरणाचा निकाल सभासदांच्या बाजूने लागल्याच्या पार्श्वभूमीवर कारखाना बचाव व पुनरुज्जीवन समितीची बैठक झाली. येत्या पंधरा दिवसात कारखान्याची अतिक्रमित दहा हेक्टर जमीन रिकामी करावी, या जागेवरील मुद्देमाल हटवावी, त्यापूर्वी क्रांती शुगरने कारखान्याच्या आठ वर्षे वापरलेल्या जागेचा मोबदला नोटीशीद्वारे मागण्यात आला.
क्रांती शुगरने नोटीस स्वीकारण्यास नकार दिल्याने नोटीस कार्यालयाबाहेर चिटकवण्यात आली. १५ दिवसात ४० कोटी रुपयांचा पारनेर कारखान्याच्या वापरलेल्या मालमत्तेचा मोबदला न दिल्यास त्यापोटी संपूर्ण कारखान्याची मालमत्ता ताब्यात घेण्यात येईल, असा इशारा नोटीशीद्वारे देण्यात आला. यावेळी समितीचे अध्यक्ष रामदास घावटे, संतोष वाडेकर, अशोक आंधळे, संभाजीराव सालके, शंकरराव गुंड, नवनाथ तनपुरे, सुनील चौधरी, दत्ता पवार, राहुल मुळे आदी उपस्थित होते.