नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात २०२५ पर्यंत इथेनॉल मिश्रीत पेट्रोल (ई २०) उपलब्ध होईल, असे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅसमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले. मंत्री पुरी यांनी इंडियन मर्चंट्स चेंबर्सच्या विशेष सर्वसाधारण सभेत बोलताना सांगितले की, पहिले E-२० विशेष ईंधन आउटलेट यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सुरू करण्यात आले होते. आता ही संख्या ६०० पेक्षा अधिक झाली आहे. आणि अशी स्टेशन्स २०२५ पर्यंत पूर्ण देशभरात सुरू होतील.
मंत्री पुरी म्हणाले की, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण २०१३-१४ मध्ये ३८ कोटी लिटरवरुन वाढून २०२१-२२ मध्ये ४३३ कोटी लिटर झाले आहे. भारताने गेल्या नऊ वर्षात प्रत्येक क्षेत्रात विकास केला आहे. ते म्हणाले की, विकास आणि ऊर्जा यांचा परस्पर संबंध स्पष्ट रुपाने दिसून येतो. कारण, देश आता जगातील तिसऱ्या क्रमांकाचा ऊर्जा ग्राहक, तिसऱ्या क्रमांकाचा इंधनाचा ग्राहक आणि तिसऱ्या क्रमांकाचा एलपीजी ग्राहक आहे.
ते म्हणाले की, देश जगातील चौथा सर्वात मोठा एलएनजी आयातदार, चौथा सर्वात मोठा रिफायनरी आणि चौथ्या क्रमांकाचा ऑटोमोबाईल बाजार आहे. केंद्रीय मंत्री पुरी म्हणाले की, भारताच्या विकासगाथेने जगाला आश्चर्यचकीत केले आहे आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला आहे. प्रत्येक भारतीयासाठी हा आशेचा आणि गर्वाचा स्रोत आहे.