लखनौ : लॅब टू लँड या थीमवर राज्य सरकार नोव्हेंबर महिन्यात कृषी कुंभ (मेळावा) आयोजित करणार आहे. लखनौमधील या प्रस्तावित कृषी कुंभचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करू शकतात. सरकारचा हा २.० कृषी कुंभमेळा आहे. यापूर्वी २०१८ मध्ये २५ ते २८ ऑक्टोबर या काळात पहिल्यांदा कृषी कुंभचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय ऊस संसोधन संस्थानमध्ये यंदाही याचे आयोजन केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कृषी कुंभमेळ्यात शेतकऱ्यांसह शेती उपकरणे तयार करणाऱ्या कंपन्यांचा सहभाग असेल. या कंपन्यांसाठी ही एक चांगली संधी ठरणार आहे. कंपन्या कृषी क्षेत्राशी संबंधीत सर्व उत्पादनांचे स्टॉल्स लावू शकतील. याशिवाय, पशुपालन, ऊस, रेशिम, मत्स्य, उद्यान, उप्र जमीन सुधारणा महामंडळ आदींचा यात समावेश असेल.
पिक वैविध्यीकरण, सेंद्रीय शेती, भूजल संरक्षण, फळे व फुलांची शेती, हायड्रोपॉनिक्स, व्हर्टिकल गार्डन, औषधी रोपे यांसह पशुपालनाचे प्रगत तंत्र, कुक्कुट पालन, शेळी पालन आदींचा यात समावेश असेल. या अनुषंगाने काही कार्यशाळांचेही आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या सभागृहाशिवाय आयोजन स्थळी तीन ते चार सभागृहांमध्ये शेतकऱ्यांना विविध सत्रांमध्ये मार्गदर्शन केले जाईल. आंतरराष्ट्रीय स्तरावरील शेती तंत्राचे आदान-प्रदान व्हावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आमचे प्रयत्न सुरू आहेत असे कृषी मंत्री सूर्य प्रताप शाही यांनी सांगितले.