केंद्र सरकारने ओपन मार्केट सेल स्कीमअंतर्गत कर्नाटकसह इतर राज्यांना तांदूळ विक्री बंद करणे आणि किमती नियंत्रित करण्यासाठी भारतीय अन्न महामंडळाला (एफसीआय) धान्याचा इ-लिलाव करण्यास सांगितले होते. मात्र, गेल्या आठवड्यात एफसीआयने ई लिलावांतर्गत ३.८६ लाख मेट्रिक टन तांदूळ खरेदीसाठी लिलाव जाहीर केला. मात्र, त्यांना फारसे खरेदीदार सापडलेले नाहीत. एफसीआयकडे ई लिलावांतर्गत १७० मेट्रिक टन तांदळासाठी बोली सादर झाल्या आहेत.
बिझनेस स्टँडर्डमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ५ जुलै रोजी ई-लिलावास एफसीआयने १९ राज्ये आणि नॉर्थ ईस्ट फ्रंटियर (NEF) क्षेत्रासाठी ३.८६ लाख मेट्रिक टन तांदळासाठी लिलाव जाहीर केला. यामध्ये १.५ लाख मेट्रिक टन तांदूळ पंजाबमधील होता. त्यानंतर तामिळनाडूतील ४९,००० मेट्रिक टन आणि कर्नाटकमधील ३३,००० मेट्रिक टन तांदूळ यात समाविष्ट होता असे इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तामध्ये म्हटले आहे.
एम जंक्शनच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, एफसीआयकडे तीन राज्यांकडून बोली मिळाल्या आहेत. महाराष्ट्रातून ७० मेट्रिक टन, गुजरातमधून ५० मेट्रिक टन आणि कर्नाटकमधून ४० मेट्रिक टन तसेच एनईएफ क्षेत्रातून १० मेट्रिक टन तांदळाच्या बोली आल्या आहेत. उर्वरित सोळा राज्यांमधून कोणीही खरेदीदार एफसीआयला मिळालेला नाही. यामध्ये हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, तामिळनाडू, बिहार, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, आंध्र प्रदेश, नागालँड, ओडिशा, दिल्ली, केरळ, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड, राजस्थान आणि उत्तराखंडचा समावेश आहे. ई लिलावात फक्त खासगी व्यावसायिकांनाच सहभागाची मुभा आहे. राज्यांना यात बंदी घालण्यात आली आहे.