चंदीगढ : हरियाणातील साखर कारखाने आता साखरेसह सीएनजी गॅसचे उत्पादन करणार आहेत. केंद्र सरकारच्या बायोमासचा इंधन म्हणून वापर करण्याच्या आदेशानंतर शुगर फेडरेशनच्या सल्ल्याने सीएनजी उत्पादनाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार साखर कारखान्यांमध्ये साखर उत्पादनादरम्यान तयार होणाऱ्या उपपदार्थ मीली किंवा प्रेस मडपासून सीएनजी तयार केला जाईल. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत एका कारखान्यामध्ये सीएनजी उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे २० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, हरियाणातील उद्योगांमध्ये हळूहळू बायोमासचा वापर इंधन म्हणून करण्यास सांगण्यात आले आहे. त्यातून कोळशावरील अवलंबित्व कमी होऊ शकेल आणि कार्बन डायऑक्साइडचे उर्जसन कमी होईल. सद्यस्थितीत हरियाणातील साखर कारखाने बायोमासवरच चालवले जातात. त्यानंतरही सरकारच्या निर्णयानुसार साखर कारखान्यांनी पर्यावरण रक्षणासाठी सीएनजीचे उत्पादन करण्याचे ठरवले आहे. १० साखर कारखान्यांमध्ये सीबीजी म्हणजेच कॉम्प्रेस्ड बायोगॅसचे उत्पादन केले जाईल. आठ कारखान्यांमध्ये पेट्रोल पंपावर वाहनांसाठी तर दोन कारखाने दुसऱ्या वापरासाठी त्याची विक्री करतील. एक कारखाना एका दिवसात पाच टन सीएनजीचे उत्पादन करेल.