लखनौ : जोरदार पावसामुळे मरेठ आणि सहारनपूर विभागातील सखल भागात पाणी साठले आहे. त्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. सहारनपूर जिल्ह्यातील बिहारीगढ भागात भूस्खलन झाल्याने दिल्ली-डेहराडून महामार्गावरील वाहतूकही ठप्प झाली. गंगा आणि यमुना दोन्ही नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहात आहेत.
नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने शेतांमध्ये पूर आला आहे. त्यामुळे ऊस आणि चारा पिकांचे नुकसान होवू शकते. हस्तिनापूर विभागात नद्यांच्या उधाणामुळे शेती पाण्याखाली गेली आहे. जर हे पाणी दीर्घकाळ राहिले तर ऊस व चारा पिकांचे नुकसान होऊ शकते असे शेतकऱ्यांनी सांगितले.
बागपत जिल्ह्यातील संक्रौड गावाजवळील यमुनेच्या तटबंदीला गळती लागली आहे. यातून होणारे नुकसान टाळण्यासाठी ग्रामस्थांनी त्याची तात्पुरती दुरुस्ती केली. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अन्यथा पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे त्याचे आणखी नुकसान होऊ शकते, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. काठा, निवारी, तांडा, कोटाणा, फैजपूर निनाना या गावातील शेकडो एकर शेत जमिनींमध्ये पाणी साचल्याने भाजीपाला व पिकांचे नुकसान झाले आहे. सहारनपूर जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला आहे. शहरी भागात २५ तर ग्रामीण भागात १२ ठिकाणी पाणी साठले आहे. प्रशासनाने २२५ लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.