ढाका : बांगलादेशचे वाणिज्य मंत्री टीपू मुन्शी यांनी कडक इशारा देवूनही सरकारने जादा किमतीने सुरू असलेल्या साखर विक्रीवर कठोर कारवाई केलेली नाही. त्यामुळे ग्राहक हवालदिल झाले आहेत. टेरिफ आयोगाने केलेल्या दाव्यानुसार साखर कारखाने सध्याच्या स्तरावर कमीत कमी १५ टका (बांगलादेशी चलन) जादा नफा कमवत आहेत. बाजारातील साखरेच्या किमती सध्याच्या सरकारने ठरवलेल्या किमतीच्या तुलनेत जादा आहेत.
१९ जून रोजी शुगर रिफायनर्स असोसिएशनने वाणिज्य सचिवांना पत्र पाठवून साखरेच्या दरात २५ टका प्रती किलो वाढ करण्याची मागणी केली होती. २२ जून रोजी वाणिज्य मंत्री टीपू मुन्शी यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली जाणार नाही. ईदनंतर नव्या दराला मंजुरी दिली जाईल असे सांगितले. साखरेवरील व्हॅट आणि इतर शुल्क कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
शुक्रवारी ढाक्यातील घाऊक बाजारापैकी एक असलेल्या कारवा बाजारात साखर १३५ टका प्रती किलो होती. एक किलोमीटर अंतरावरील हतिरपूलमध्ये किरकोळ विक्रेते त्याची १५० टका प्रती किलो दरानेही विक्री करण्यास तयार नव्हते. दहा मे रोजी वाणिज्य मंत्रालयाचे सचिव तपान कांती घोष यांनी खुली साखर १२० टका प्रती किलो आणि पॅकेज्ड साखर १२५ टका प्रती किलोने विक्री करण्याची घोषणा केली होती. मात्र, त्याची विक्री १४० टका प्रती किलोने सुरू आहे.