सोलापूर : करमाळा तालुक्यातील आदिनाथ साखर कारखान्याने यंदाच्या गाळप हंगाम यशस्वी करण्याचा निर्धार केल्याची माहिती प्रशासकीय संचालक बाळासाहेब बेंद्रे यांनी दिली. ते म्हणाले, यंदा कारखान प्रशासनाने पाच लाख टन ऊस गाळपाचे उदिष्ट् ठेवले आहे. त्यांनी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऊस गाळपाला पाठवावा, असे आवाहन केले. ते म्हणाले, यंदाचा हंगाम सर्वांच्या सहकार्याने यशस्वी करण्यात येणार आहे.
आगामी गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कारखाना कार्यस्थळावर आढावा बैठक झाली. या बैठकीसाठी प्रशासकीय संचालक महेश चिवटे, संजय गुटाळ, मधुकर कदम, जनरल मनेजर सुरेश पाटील, चीफ केमिस्ट पोपट क्षीरसागर आदी उपस्थित होते. या बैठकीत अधिकाऱ्यांची नेमणूक निश्चित करण्यात आली. चिवटे म्हणाले, गेल्या वर्षीच्या हंगामात आवश्यकता नसताना ९७ लाख रुपयांच्या पाईप खरेदी केल्याचे निदर्शनास आले आहे. डिझेल पंपाचे पैसे इतरत्र वापरल्यामुळे आदिनाथ कारखान्याला या पंपापासून दर महिन्याला मिळणारे तीन लाख कमिशन बंद झाले आहे. मागील संचालक मंडळाच्या चुका दुरुस्त करण्याचे काम सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.