हरियाणामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नोंदणी अनिवार्य

सोनीपत : हरियाणातील शेतकऱ्यांना आता साखर कारखान्याला ऊस पुरवठा करण्यासाठी माझे पिक, माझा तपशील पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. यासोबत सर्व्हेतील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी १० ऑगस्टपर्यंत सूचना मागविण्यात आल्या आहेत. पोर्टलवर नोंदणीनंतर मिळणारी ई प्रत कारखान्यात जमा करण्यास सांगण्यात आली आहे.

भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सोनीपत सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनुपमा मलिक यांनी सोमवारी सांगितले की, शेतकऱ्यांनी आपल्या ऊस  लागवड क्षेत्राची नोंदणी लवकरात लवकर करावी. नोंदणी केल्यानंतर त्याची एक प्रत ऊस कार्यालयाकडे जमा करावी. सरकारच्या निर्देशानुसार, कोणत्याही सरकारी विभागाकडील अनुदान अथवा सुविधा मिळवण्यासाठी या पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे.

गळीत हंगाम २०२३-२४ साठी ऊसाच्या सर्व्हेचे कामकाज कारखान्याकडून शेतांमध्ये जावून पूर्ण करण्यात आले आहे. सोनीपत कारखान्याकडे एकूण १३ हजार ८७८ एकर ऊस क्षेत्र आहे. शेतकऱ्यांनी ८ हजार ४२७ एकर लागण तर ५ हजार २४९ एकर खोडवा ऊस पिक घेतले आहे. यादीतील सर्व गावांमधील सर्व्हेची माहिती सार्वजनिक ठिकाणी, चौकांमध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या यादीची तपासणी करावी. जर काही अडचणी असतील तर १० ऑगस्टपर्यंत ऊस विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. मलिक यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here