मुंबई : गेल्या एक आठवड्यापासून उत्तर भारत जोरदार पावसाच्या विळख्यात सापडला आहे. हरियाणा, पंजाब, हिमाचल, उत्तराखंडपासून दिल्लीपर्यंत सर्व काही जलमय झाले आहे. दिल्लीमध्ये तर ४८ वर्षानंतर प्रचंड पूर आणि पाऊस झाला आहे. आता मुंबईतही पावसाला सुरुवात झाली आहे.
न्यूज१८मधील वृत्तानुसार, या आठवड्याची सुरुवात मुंबईकरांसाठी जोरदार पावसाने झाली आहे. सोमवारी शहरात जोरदार पावसाची नोंद झाली. भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुर्ण आठवडाभर ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. बुधवार वगळता सर्व दिवसांसाठी यलो अलर्ट आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचे संकेत आहेत.
रायगड जिल्ह्यात २१ जुलैपर्यंत तर पालघर, ठाणे जिल्ह्यात २० जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट आहे. कोकण विभागातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. टाइम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार, पुढील दहा दिवसांत मुंबईसह आसपासच्या भागात जोरदार पाऊस सुरू राहिल. त्यामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.