महाराष्ट्राच्या अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांवरील वाहनांची वाहतूक संथ झाली आहे. काल अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. धरण क्षेत्रात संततधार सुरू आहे. कोल्हापूर शहर – जिल्ह्यात दिवसभर पाऊस सुरू राहिला. या पावसाने जिल्ह्यातील सर्व नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी हे बंधारे पाण्यात बुडाले आहेत.
एबीपी लाईव्हमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांताली पाऊस पाहता पश्चिम महाराष्ट्रात आणखी जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामानशास्त्र विभागाने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या सर्व जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. यासोबतच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जोरदार पावसानंतर रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले की, मुंबईत मुसळधार पावसानंतर बदलापूर-अंबरनाथ रेल्वे ट्रॅक बंद करण्यात आला आहे. आयएमडीने आज पालघर आणि रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट आणि ठाणे, मुंबई, रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाळी स्थितीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून कोकणात चिपळूण आणि आसपासच्या परिसरातील पावसाने वशिष्ठी नदीची पाणीपातळी वाढली आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्र यांनी चिपळूणसह जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला आहे. हवामान विभागानेही पुढील चार दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन व मदत कार्यासाठी पथकांना सज्ज राहण्यास सांगितले आहे. एनडीआरएफची पथकेही तैनात करण्यात आली आहेत.