मुंबई : मुंबईसह राज्यातील बहुतांश भागाला बुधवारी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला असून अनेक मार्गावरील ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हजारो प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता आहे. अंबरनाथ-बदलापूर विभागातील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी बदलापूर-अंबरनाथमधील रेल्वे रुळावर पाणी साचले होते. त्यामुळे अप-डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली.
दरम्यान, सीएसएमटी ते अंबरनाथ आणि बदलापूर ते कर्जत मार्गावरील वाहतूक सुरू आहे. मात्र अंबरनाथ – बदलापूर अप-डाऊन मार्गावरील वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव बंद आहे.बदलापूरमध्ये पुन्हा पूर परिस्थितीची शक्यता निर्माण झाली आहे. उल्हास नदीची पाणी पातळीत वाढ झाली आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.