बिजनौर : वेव्ह ग्रुपच्या बिजनौर साखर कारखान्याशी संलग्न शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बिजनौर साखर कारखाना आगामी गळीत हंगामात आपली गाळप क्षमता वाढवून ४५ टीसीडी (टन प्रती दिन) करणार आहे. साखर कारखान्याच्या गाळप क्षमतेत दहा टीसीडीची वाढ करण्याचे काम गतीने सुरू आहे. क्षमता वाढीसह कारखान्याने आपल्या जुन्या कार्यक्षेत्राचीही मागणी केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, नूरपूर विभागातील चांगीपूरमध्ये एक साखर कारखाना उभारला जात आहे. याशिवाय बिजनौर साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढवली जात आहे. त्यामुळे आता ऊस गाळपास उशीर होणार नाही. बिजनौर साखर कारखान्याची गाळप क्षमता सध्या ३५ टीसीडी आहे. गेल्या गळीत हंगामात ४८.०८ लाख क्विंटल ऊस गाळप करून हंगामाची समाप्ती २४ एप्रिल रोजी करण्यात आली होती. कारखाना जुना असल्याने अतिशय संथ गतीने गाळप केले जात होते.
कारखान्याचे गाळप हळूहळू होत असल्याने कार्यक्षेत्रातील ऊस इतर कारखान्यांना वळविण्यात आला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कारखान्याने देखभाल-दुरुस्तीची कामे पूर्ण केली आहेत. आता दहा टीसीडी क्षमता आणखी वाढणार आहे. त्यामुळे ४५ टीसीडी गाळप होवू शकेल. कारखान्याच्या गाळप क्षमतेत वाढ होणे ही अतिशय चांगली बाब असल्याचे सालमाबाद येथील शेतकरी वरुण कुमार यांनी सांगितले. आदमपूर गावचे शेतकरी सुभाष काकरान म्हणाले की, कारखान्याने ऊस बिलेही वेळेवर द्यावीत अशी अपेक्षा आहे. कारखान्याकडे २८ ऊस खरेदी केंद्रे होती. त्यामध्ये १६ केंद्रांची वाढ करावी अशी मागणी केली आहे असे सरव्यवस्थापक राहुल सिंह यांनी सांगितले.