बेतिया : बिहार राज्य ऊस उत्पादक संघाच्या पश्चिम चंपारण्य जिल्हा समितीने गुरुवारी उसाचा दर ५०० रुपये करण्याच्या मागणीसाठी मझौलिया साखर कारखान्यासमोर धरणे आंदोलन केले. बिहार राज्य ऊस उत्पादक संघाचे महासचिव प्रभुराज नारायण राव यांनी सांगितले की, सद्यस्थितीत देशातील शेतकरी संकटात आहेत. उत्पादन खर्चही मिळत नसल्याने त्यांच्यासमोर शेती करावी की करू नये अशी बिकट स्थिती निर्माण झाली आहे.
सद्यस्थितीत शेती करणे तोट्याचे बनले आहे. ऊस शेती एक वर्षभर केली जाते. बियाण्याशिवाय खते, मशागतीचा खर्च, ऊस तोडणी, वाहतूक यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात. अशा स्थितीत केंद्र सरकारने केवळ १० रुपये एफआरपी वाढवली. ही शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे, अशी टीका महासचिव प्रभुराज नारायण राव यांनी केली. कमीत कमी ५०० रुपये प्रती क्विंटल दर सरकारने करण्याची गरज आहे, अशी मागणी त्यांनी केली.
भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, उसाच्या उप उत्पादनांचा नफा शेतकऱ्यांना देण्याची गरज असल्याची मागणी त्यांनी केली. वीज, इथेनॉल, खाद्य, स्पिरीट आदींपासूनच्या नफ्यात शेतकऱ्यांना ५० टक्के हिस्सा द्यावा. साखर नियंत्रण कायदा १९६६ नुसार ऊस खरेदी केल्यानंतर १४ दिवसात पैसे मिळावेत, अथवा व्याजासह भरपाई द्यावी, ऊसाच्या वजनात घोटाळा करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करावेत अशा मागण्या त्यांनी केल्या. सभेच्या अध्यक्षस्थानी लालबाबू यादव होते. चांदसी प्रसाद यादव, ऊस उत्पादक संघाचे जिल्हा सचिव वहीद, हनीफ, सुनील यादव, सरपंच संजय राव, अवधबिहारी प्रसाद, राजेंद्र चौबे, संजीव राव, महाफुज, मनोज कुशवाहा, सूर्यबली यादव, अंबिका पंडित आदी उपस्थित होते.