गेल्यासात महिन्यांमध्ये सरकारच्या हस्तक्षेपात कमतरता भासल्याने किरकोळ बाजारात साखरेचा दर प्रती किलो ५० रुपयांनी (PKR- पाकिस्तानी चलन) वाढले आहेत.
डिसेंबर २०२२ मध्ये साखर प्रती किलो १०० PKR होती, हा दर आता कथीत तस्करीमुळे वाढून १५० PKR झाला आहे. द एक्स्प्रेस ट्रिब्यूनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, एका नेटवर्ककडून या कालावधीत अफगाणीस्तानला हजारो टन साखरेची तस्करी करण्यात आली असल्याचा संशय व्यक्त होत आहे असे सूत्रांनी सांगितले.
पाकिस्तानमधील पंजाब सरकारने आता राज्यात आटा आणि साखरेची साठेबाजी करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मुख्य सचिवांनी अलिकडेच साखरेची तस्करी रोखण्यासाठी पोलिसांच्या खास शाखेकडे जबाबदारी सोपवली आहे. एका बैठकीच्या अध्यक्षस्थानी असताना त्यांनी आटा आणि साखरेच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासंबंधीच्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
सरकारी दरापेक्षा जादा किमतीवर आटा आणि साखरेची विक्री खपवून घेतली जाणार नाही असा इशारा मुख्य सचिवांनी दिला आहे.