केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी सहारा समूहाच्या सहकारी संस्थांमधील ठेवी परत करण्यासाठी सहारा रिफंड पोर्टल लॉन्च केले. गेल्या चार दिवसांत, हे पोर्टल लाँच झाल्यापासून पाच लाख गुंतवणूकदारांनी नोंदणी केली आहे. सहकार मंत्री अमित शहा यांनी ही माहिती दिली. पोर्टलवर नोंदणीनंतर गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.
आजतकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सहारा समूहाच्या चार सहकारी संस्थांमधील गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी १८ जुलै रोजी सीआरसीएस म्हणजेच सहारा रिफंड पोर्टल’ सुरू झाले आहे. त्यामुळे १० कोटी गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. सहारामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना पोर्टलद्वारे पैसे परत मिळतील. ज्यांच्या गुंतवणुकीचा कालावधी पूर्ण झाला आहे, त्यांना रक्कम परत केली जाईल. याबाबतची सर्व माहिती रिफंड पोर्टलवर उपलब्ध असेल.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ही प्रक्रिया सुरू झाली आहे. सहारा क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सहारायन युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी, हमारा इंडिया क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि स्टार्स मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांचा यात समावेश आहे.