कोल्हापूर : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याची सत्ता सभासदांनी अत्यंत विश्वासाने आपल्याकडे सोपवली आहे. त्या विश्वासाला तडा लागू न देता समन्वयाने काम करा, लागेल ते सहकार्य करू, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी कामगारांनी थकीत पगार आणि भविष्य निर्वाह निधीसाठी कारखाना कार्यस्थळावरील प्रशासकीय कार्यालयाला टाळे ठोकले होते. कारखाना व्यवस्थापन आणि कामगार यांच्यातील थकीत पगार, थकीत भविष्य निर्वाह निधी, हंगामी कामगारांचा रिटेन्शन अलाउन्स याबाबतची बोलणी फिस्कटल्याने ११ जुलै २०२३ पासून कामबंद आंदोलन सुरु आहे.
दरम्यान, संचालक मंडळाच्या बैठकीत कामगार पगाराच्या मुद्द्यावरून संचालकांत दुफळी पडली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री मुश्रीफ यांनी कारखान्याचे चेअरमन डॉ. प्रकाश शहापूरकर, उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह सर्व संचालकांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बैठक घेतली. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी सर्वाना समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी संचालक सतीश पाटील, प्रकाश पताडे, विद्याधर गुरबे आदी उपस्थित होते.