नवी दिल्ली : देशांतर्गत किमतीमधील वाढ आणि पुढील हंगामात पिकाच्या उत्पादनात घट होण्याच्या शक्यतेने भारताने विविध श्रेणीतील तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे धान्याच्या जागतिक स्तरावरील किमती वाढू शकतात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जागतिक स्तरावर अन्न सुरक्षेचा विषय चिंतेचा बनला असताना भारताचा हा निर्णय समोर आला आहे.
भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार आहे. भारताकडून १४० देशांना शिपमेंट जाते. जागतिक तांदूळ व्यापारात भारताचा हिस्सा ४० टक्के आहे. सरकारने गुरुवारी निर्बंधांची घोषणा करताना म्हटले आहे की, देशातील किमती गेल्या वर्षी ११.५ टक्के आणि गेल्या महिन्यात ३ टक्क्यांनी वाढल्या आहेत. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या एका निवेदनानुसार, भारतीय बाजारात गैर बासमती तांदळाची उपलब्धता करणे आणि देशातील किमतीमधील वाढ कमी करणे यासाठी निर्यात धोरणात सुधारणा करण्यात आली आहे.
भारताचा हा निर्णय काळ्या समुद्राच्या माध्यमातून युक्रेनचा गहू सुरक्षित मार्गे आणण्याच्या करारापासून रशिया मागे घटल्यानंतर काही दिवसांनंतर आला आहे. या निर्णयाने किमती वाढू शकतात असा इशारा देण्यात आला आहे. द इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राचे कृषी संपादक हरीश दामोदरन यांनी ‘व्हिओए’ला सांगितले की, भारताच्या तांदूळ निर्यात निर्बंधाचा परिणाम जागतिक किमतीवर पडणे निश्चित आहे. दामोदरन यांच्या म्हणण्यानुसार, भारत जवळपास २२.५ मिलियन
टन तांदूळ निर्यात करतो. आता जवळपास १० दशलक्ष टन तांदूळ आंतरराष्ट्रीय बाजारातून बाहेर गेला आहे. त्यातून आपला ४० टक्के निर्यात संपुष्टात येईल. अभ्यासकांच्या मते भारत हे निर्बंध लवकर हटवणार नाही. कारण अन्नधान्याच्या महागाईशी झुंज द्यावी लागत आहे. अन्नधान्याच्या किमतींमधील वाढ हा सरकारसाठी संवेदनशील मुद्दा आहे. कारण देशात या वर्षाच्या अखेरपर्यंत अनेक राज्यातील निवडणुका होणार आहेत. तर पुढील वर्षी देशाच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्याची तयारी सुरू आहे.
गेल्या वर्षभरापासून भारताने कृषी निर्यातीबाबत कडक भूमिका घेतली आहे. एक वर्षापूर्वी गव्हाच्या निर्यातीवरील घातलेली बंदी उठवण्यात आलेली नाही. अलिकडे देशाच्या उत्तरेत मुसळधार पावसाने भात पिकवणाऱ्या प्रमुख राज्यांत पूर आला आहे, तर दक्षिणेकडे अल्प पावसाने अनेक शेतकरी पिकांची लागवड करू शकलेले नाहीत.
कृषी अभ्यासक देविंदर शर्मा यांनी व्हीओएला सांगितले की, पंजाब, हरियाणात जोरदार पाऊस आणि पूर आला आहे. ही दोन राज्य देशाला अतिरिक्त तांदूळ पुरवठा करतात. दक्षिणेकडील राज्यांकडे सिंचन सुविधा नाही. त्यामुळे पावसाच्या कमतरतेचा त्यांच्यावर प्रतिकूल परिणाम होतो.
ते म्हणाले की, अल निनोच्या प्रभावामुळे चिंता आहे. आशियात त्यातून गरम, कोरडे हवामान तयार होवून कमी पाऊस पडतो. भात उत्पादनास पुरेशा पाण्याची गरज आहे. शर्मा म्हणाले की, सरकारला आणखी सतर्क राहण्याची गरज आहे. दामोदरन यांच्या म्हणण्यानुसार तांदूळ निर्यात निर्बंध राजकीय अडचणी आणि धोरणे लक्षात घेवून घेतला गेला आहे.