बिजनौर : आगामी काळात बिजनौर जिल्ह्यात उद्यान विभाग आणि निर्यातदारांकडून जिल्ह्यात मिरचीच्या शेतीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. परदेशात मिरचीला मागणी असल्याने शेतकरी यापासून कमी खर्चात चांगले उत्पादन मिळवू शकतात. त्यामुळे जिल्ह्यात ६८०७ आणि जी ११ आदी प्रजातीच्या मिरचीची लागवड केली जाणार आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सध्या जिल्ह्यात अगदी किरकोळ म्हणजे पाच एकरात मिरचीचे उत्पादन घेतले जाते. उद्याग विभाग शेतकऱ्यांना या पिकाबाबत प्रोत्साहन देत आहे. ५० हेक्टर क्षेत्रात शेती केली जाणार आहे. फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनीचे संचालक डॉ. शोएब यांनी सांगितले की, अधिक उत्पादन देणाऱ्या मिरचीच्या वाणापैकी ६८०७, जी ११ आदींची लागवड केली जाईल. शेतकरी मिरची विक्री ११५ ते १४५ रुपये किलो दराने करू शकतात. जिल्ह्यातील गुळ, तांदूळ, भाजीपाला, आंबे, ढब्बू मिरची, साधी मिरची आखाती देशात पाठवली जातात. दिल्ली आणि उत्तराखंड जवळ असल्याने निर्यातदार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहेत.
जिल्हा उद्यान अधिकारी जितेंद्र कुमार यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना भाजीपाला, केळी आणि फळबाग लागवडीसाठी सतत प्रेरित केले जात आहे. बाजारातील मागणीनुसार पेरणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांची पिके निर्यातदारांना मिळत आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव मिळावा व त्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.