रामपुर : नूतन जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी राणा साखर कारखान्याला भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांनी कारखान्याच्या सरव्यवस्थापकांना आगामी गळीत हंगामापूर्वी शेतकऱ्यांना थकीत ऊस बिले देण्याचे निर्देश दिले.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, नूतन जिल्हा ऊस अधिकारी शैलेश मौर्य यांनी बुधवारी राणा साखर कारखान्यात पोहोचून पाहणी केली. त्यांनी २०२२ आणि २०२३ या काळातील गळीत हंगामात शेतकऱ्यांचे थकीत असलेले ४२ कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले. सरव्यवस्थापक के. पी. सिंह यांना इशारा देताना कारखान्याने १४ दिवसांत ऊस बिले देण्याच्या नियमांचे पालन करावे असे सांगितले.
जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या शेतकऱ्यांना ऊसाच्या नोंदी दाखवून त्याची पडताळणी करण्याची मोहीम सुरू आहे. शेतकऱ्यांनी आपल्या नोंदीची तपासणी करावी. आगामी गळीत हंगामात कोणतीही अडचण येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. आगामी गळीत हंगाम २०२४-२५ चा आढावा त्यांनी यावेळी घेतला. कारखान्याच्यावतीने जी देखभालीची कामे केली जात आहे, त्याची पाहणी अधिकाऱ्यांनी केली. शेतकऱ्यांनी अधिकाधिक ऊसाचे उत्पादन करावे आणि तो ऊस कारखान्याकडे गाळपास पाठवावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी राणा साखर कारखान्याचे महा व्यवस्थापक के. पी. सिंह, युनिट हेड हरवीर सिंह यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.