कोल्हापूर : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या कामगारांनी थकीत पगार आणि भविष्य निर्वाह निधीसाठी ११ जुलै २०२३ पासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. कारखाना प्रशासनाकडून आगामी गाळप हंगामाची तयारी सूर असताना कामगारांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. या प्रश्नावर गुरुवारी संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत आगामी हंगाम यशस्वी करण्यासाठी कामगारांशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
तत्पूर्वी, संचालक मंडळाच्या बैठकीत कामगार पगाराच्या मुद्द्यावरून संचालकांत दुफळी पडली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी चार दिवसांपूर्वी कारखान्याचे चेअरमन डॉ. प्रकाश शहापूरकर, उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह सर्व संचालकांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बैठक घेतली होती. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी सर्वाना समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. कामगारांनीही आंदोलन करताना प्रशासनासमोर काही प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. त्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे त्यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता संचालक मंडळ कामगारांसमोर कोणता प्रस्ताव ठेवणार? आंदोलन चिघळणार कि मिटणार ? याकडे कामगारांसह शेतकऱ्यांचेही लक्ष्य लागले आहे.