बिगर बासमती तांदूळ निर्यात बंदीमुळे महागाई वाढू शकते : आयएमएफचा इशारा

नवी दिल्ली : तांदळाच्या विशिष्ट श्रेणीच्या निर्यातीवरील निर्बंध उठवण्यासाठी भारताकडे प्रयत्न केले जातील, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) म्हटले आहे. ही निर्यातबंदी कायम राहिल्यास जागतिक चलनवाढीवर परिणाम होऊ शकतो, असे आयएमएफचे म्हणणे आहे.

जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, केंद्र सरकारने देशांतर्गत तांदूळ पुरवठा कायम राखण्यासाठी आणि आगामी सणांच्या काळात किमती नियंत्रित ठेवण्यासाठी २० जुलै रोजी बिगर बासमती पांढर्‍या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली. अन्न मंत्रालयाने गैर-बासमती आणि बासमती तांदळाच्या निर्यात धोरणात कोणताही बदल होणार नाही, असे म्हटले आहे.

या दोन्ही प्रकारच्या तांदळाच्या निर्यातीचा भारताच्या एकूण निर्यातीत मोठा वाटा आहे. देशातून निर्यात होणाऱ्या एकूण तांदळात गैर-बासमती पांढर्‍या तांदळाचा वाटा सुमारे २५ टक्के आहे. सध्याच्या परिस्थितीत अशा प्रकारच्या निर्बंधांमुळे उर्वरित जगामध्ये अन्नधान्याच्या किमतींमध्ये अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य अर्थतज्ज्ञ पियरे ऑलिव्हियर गौरींचास यांनी म्हटले आहे. आम्ही निश्चितपणे भारताकडे अशा प्रकारे निर्यातीवर लावलेले निर्बंध हटवण्यास प्रयत्न करू. कारण याचा जगावर विपरीत परिणाम होऊ शकतो असे पियरे यांनी म्हटले आहे. भारतातून प्रामुख्याने थायलंड, इटली, स्पेन, श्रीलंका आणि यूएसएला बिगर बासमती पांढरा तांदूळ निर्यात केला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here