सरकारच्या निर्णयानंतर बिगर बासमती तांदळाच्या दरात घसरण, परदेशातील बिले अडकली

नवी दिल्ली : केंद्र सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर घातलेल्या बंदीमुळे निर्यातदार व्यावसायिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. परदेशात तांदूळ पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांची बिले थांबल्याची स्थिती आहे. अतिरिक्त पुरवठ्यामुळे दिल्लीत बिगर बासमती तांदळाचे भावही कमी झाले आहेत. मात्र, येत्या काही दिवसांत या तांदळाचा दर पुन्हा वाढू शकतो, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

याबाबत नवभारत टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, दिल्ली ग्रेन मर्चंट असोसिएशनचे सचिव सचिन शर्मा यांनी सांगितले की, देशातील एकूण उत्पादनाच्या ४० टक्के गैर बासमती तांदळाची परदेशात निर्यात केली जाते. सरकारने अचानक निर्णय जाहीर केल्याने व्यापाऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. दिल्लीतील अनेक व्यापारी युएसए, कॅनडासह अनेक देशांत गैर-बासमती तांदूळ पुरवठा करतात. व्यापाऱ्यांनी अॅडव्हान्स बुकिंगही घेतले आहे. मात्र,सरकारच्या निर्बंधामुळे सर्व काही ठिप्प झाले आहे. त्यामुळे परदेशातील व्यापाऱ्यांनी जुन्या बिलांचा पुरवठा रोखला आहे.

व्यावसायिक सुरेंद्र गर्ग म्हणाले की, सरकारच्या निर्णयामुळे गैर बासमती तांदळाच्या दरात घसरण झाली आहे. दर दोन ते तीन रुपयांनी कमी झाले आहेत. मात्र, पुढील काही दिवसात पुन्हा दरवाढ होईल अशी शक्यता आहे. देशातच गैर बासमती तांदळाचा ६० टक्के खप असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. परमल चावल, सोना मसूरी आणि गोविंद भोग हे मुख्य तांदळाचे प्रकार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here