कोळशाच्या आयातीचे प्रमाण कमी करण्यासाठी देशाची कोळसा शुद्धीकरण क्षमता वाढवली पाहिजे : केंद्रीय कोळसा सचिव अमृत लाल मीणा

केंद्रीय कोळसा मंत्रालयाच्या अधिपत्याखालील भारतीय राष्ट्रीय समिती जागतिक खनन काँग्रेसने “कोळसा शुद्धीकरण – संधी आणि आव्हाने” या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले. भारतातील कोळसा क्षेत्राच्या लाभदायक भविष्याविषयी चर्चा करण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या चर्चासत्रात, उद्योग क्षेत्रातील अनेक तज्ञ, संशोधक तसेच भागधारक सहभागी झाले होते. या चर्चासत्रामुळे कोळसा क्षेत्रातील व्यक्तींसाठी ज्ञानाची देवाणघेवाण, सहयोगी संबंधांची जोपासना आणि अभिनव संशोधनाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने एक अद्वितीय व्यासपीठ निर्माण झाले.

केंद्रीय कोळसा मंत्रालयाचे सचिव अमृत लाल मीणा यांनी या चर्चासत्रात केलेल्या बीजभाषणात, कोकिंग आणि नॉन-कोकिंग प्रकारच्या कोळशाच्या वॉशरीज म्हणजेच शुद्धीकरणाची क्षमता वाढवण्याच्या तातडीच्या गरजेवर भर दिला. ते म्हणाले की असे केल्यामुळे भारताचे कोळसा आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि देशांतर्गत कोळसा क्षेत्राचा लाभ होईल. देशातील कोळसा उत्पादनाची कार्यक्षमता लक्षणीय प्रमाणात वाढवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर आणि नवनव्या खाणींचा शोध या बाबींवर त्यांनी अधिक भर दिला. त्याचबरोबर कोळशाच्या वाहतुकीतील अडथळ्यांवर मात करण्यासाठी विविध रेल्वे प्रकल्प हाती घेण्यात आले असून कोळसा उद्योगाच्या वाढीसाठी अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प राबवण्यात येत आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

केंद्रीय कोळसा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव एम.नागराजू यांनी कोळसा वॉशरीज प्रक्रियेतील तंत्रज्ञानाच्या सर्वोत्तम वापराचे महत्त्व अधोरेखित केले. अत्याधुनिक तंत्रे आणि पद्धतींचा स्वीकार करून, कोळसा क्षेत्र उच्च दर्जाच्या कोळशाचे अधिकाधिक उत्पादन करू शकते आणि त्यायोगे, भारताची उर्जा सुरक्षा आणि शाश्वतता विषयक ध्येयांप्रती योगदान देऊ शकते असे ते म्हणाले.

याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना कोल इंडिया (सीआयएल) कंपनीचे अध्यक्ष पी.एम.प्रसाद यांनी कोकिंग आणि नॉन-कोकिंग प्रकारच्या कोळशाच्या दर्जात सुधारणा करण्याच्या बाबतीत वॉशरीजची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली तसेच विविध क्षेत्रांना उच्च दर्जाच्या कोळशाचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यात कोळसा वॉशरीजला असलेल्या महत्त्वावर अधिक भर दिला.

केंद्रीय मंत्रालयाच्या अखत्यारीतील सीआयएलचे संचालक (तांत्रिक) आणि सीसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ.बी.वीरा रेड्डी यांनी पुढच्या वर्षीपासून शेजारी देशांना कोळशाची निर्यात करण्याच्या कोळसा मंत्रालयाच्या योजनेची माहिती दिली. यामुळे याप्रदेशातील प्रमुख कोळसा पुरवठादार देश म्हणून भारताचे स्थान निश्चित होईल असे ते म्हणाले.

टाटा स्टील या कंपनीचे कॉर्पोरेट व्यवहार विभाग प्रमुख मनीष मिश्रा यांनी या चर्चासत्रात देशांतर्गत पोलाद उद्योगासाठी कोकिंग कोळशाच्या वापराविषयी सविस्तर माहिती दिली.

“कोळशाचे शुद्धीकरण – संधी आणि आव्हाने” या राष्ट्रीय चर्चासत्रामुळे कोळसा क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देतानाच, अधिक शुद्ध आणि उच्च दर्जाच्या कोळशाचे उत्पादन करण्याप्रती भारताच्या समर्पिततेला अधोरेखित केले. संशोधन आणि विकास कार्यामध्ये गुंतवणूक करुन, तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून आणि वाहतूकविषयक अडथळे दूर करुन कोळशाच्या वॉशिंगची संपूर्ण क्षमता वापरण्याचा आणि जागतिक कोळसा उद्योग क्षेत्रात महत्त्वाचा देश म्हणून स्थान बळकट करण्याचा भारताचा उद्देश आहे.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here