कैरो (काहिरा) : इजिप्तमध्ये साखरेचा दर EGP १९,००० प्रती टनावरून एका महिन्यात जवळपास २६ टक्के वाढून EGP २४,००० प्रती टनावर पोहोचला आहे, असे फेडरेशन ऑफ इजिप्शियन इंडस्ट्रिज (एफईआय) च्या साखर विभागाचे प्रमुख हसन अल-फेंडी यांनी म्हटले आहे. इजिप्तमध्ये वार्षिक सुमारे २.८ मिलियन टन साखर उत्पादन केले जाते. तर देशांतर्गत साखरेचा खप ३.२ मिलियन टनापेक्षा अधिक आहे. यातून खप आणि उत्पादन यातील अंतर स्पष्ट होते.
याशिवाय, पुरवठा मंत्रालयाचे अली मोसेली यांनी सांगितले की, जनरल अॅथॉरिटी फॉर सप्लाय कमोडिटीज (जीएएससी) ब्राझीलकडून १,५०,००० टन कच्ची साखर आयात करण्यास सहमत आहे. ही साखर पुढील सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये मिळेल. ते म्हणाले की, इजिप्तमधील साखरेचा धोरणात्मक साठा फेब्रुवारी २०२४ पर्यंत पुरेसा आहे. साखर उत्पादक सद्यस्थितीत २०२३-२४ च्या पिक हंगामासाठी करारावर चर्चा करीत आहेत. हा हंगाम ऑक्टोबरपासून सुरू होईल.