देशातील 86 विमानतळ सध्या हरित उर्जेचा वापर करत आहेत

आजघडीला देशातील 86 विमानतळ हरित ऊर्जेचा वापर करत आहेत आणि त्यापैकी 55 विमानतळांवर वापरली जाणारी संपूर्ण म्हणजे 100% ऊर्जा ही हरित प्रकारची ऊर्जा आहे. या विमानतळांच्या नावांची यादी परिशिष्टात दिली आहे

तरीही, विमानतळांवर पारंपरिक ऊर्जा स्रोतांचा केला जाणारा वापर तेथील कार्बन उत्सर्जनाचे मुख्य कारण आहे आणि म्हणून बिगर-नवीकरणीय उर्जेऐवजी हरित ऊर्जा स्रोतांचा वापर केल्यास त्यामुळे विमानतळांच्या कार्बन पदचिन्हांचे प्रमाण कमी करण्यात मदत होईल. म्हणून, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने विमानांचे नियमित परिचालन करणाऱ्या कार्यरत विमानतळांनी आणि नव्याने उभारल्या जाणाऱ्या ग्रीनफिल्ड विमानतळांच्या विकासकांनी कार्बन तटस्थता तसेच शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आणि इतर अनेक उपाययोजनांबरोबरच हरित ऊर्जेच्या वापराचा देखील यात समावेश होतो.

जगभरातील विमानतळे आता नवीकरणीय/हरित ऊर्जेच्या वापरावर सातत्याने लक्ष केंद्रित करत आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषदेच्या (एसीआय) मान्यता कार्यक्रमानुसार, युकेमधील हिथ्रो, ब्रिस्टल आणि लंडन गॅटविक हे विमानतळ, नेदरलँड्स मधील ऍम्सटरडॅम, ग्रीसमधील अथेन्स, नॉर्वे येथील ऑस्लो, बेल्जियममधील ब्रसेल्स, हंगेरी येथील बुडापेस्ट, डेन्मार्कमधील कोपनहेगन, अमेरिकेतील सॅन दिएगो, कॅनडा येथील व्हँकुव्हर, संयुक्त अरब अमिरात येथील शारजा इत्यादी विमानतळांनी नवीकरणीय/हरित उर्जेच्या वापरासह विविध उपाययोजनांच्या मालिकेची अंमलबजावणी करून कार्बन तटस्थता मिळवली आहे.

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जनरल (डॉ.) व्ही.के.सिंह (निवृत्त) यांनी आज लोकसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here