इथेनॉल प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडून सर्वोतोपरी सहकार्य करू : केंद्रीय मंत्री अमित शाह

पुणे : महाराष्ट्रातील सर्वच साखर कारखान्यांमधून इथेनॉल उत्पादन केले जाईल यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी रविवारी केले. पुणे येथील केंद्रीय सहकार निबंधक (सीआरसीएस) कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी इथेनॉल प्रकल्प हाती घ्यावेत, त्यांना केंद्र सरकारकडून हवी ती मदत केली जाईल, असेही शाह यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय मंत्री शाह म्हणाले की, सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून डिस्टिलरीजची उभारणी करण्यासाठी प्रचंड प्रमाणात निधी उपलब्ध आहे. राज्यातील साखर कारखान्यांनी या कर्ज सुविधेचा लाभ घ्यावा. महाराष्ट्रातील एकही साखर कारखाना इथेनॉल बनवत नाही, अशी स्थिती राहू नये. इथेनॉल ही उदयोन्मुख बाजारपेठ आहे. इथेनॉलला दरही चांगला मिळत आहे. इथेनॉल उत्पादन वाढीमुळे साखर कारखाने आणि शेतकऱ्यांच्याही उत्पन्नात वाढ होणार आहे.

शाह पुढे म्हणाले, सीआरसीएस कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलमुळे कामाची कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढेल. सहकारी क्षेत्र आधुनिकीकरण, पारदर्शकता आणि जबाबदारी घेतल्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाही. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here