ढाका : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट ऊस बिले जमा व्हावीत, यासाठी बांगलादेश शुगर अँड फूड इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन (बीएसएफआयसी) आणि देशातील सर्वात मोठी मोबाइल फायनान्शिअल सर्व्हिस (एमएफएस) असलेल्या bKash यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांची बिले पारदर्शक व सोयीस्करपणे मिळण्यास मदत होणार आहे. ऊस संकलन प्रक्रियासुद्धा सुरळीत होईल, असा दावा बीएसएफआयसीने केला आहे.
द बिझनेस स्टँडर्ड न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, बीएसएफआयसीचे सचिव रुहुल अमीन कैसर आणि बीकॅशचे मुख्य व्यावसायिक अधिकारी अली अहमद यांनी या करारावर स्वाक्षरी केली. यावेळी उद्योग मंत्रालयाचे सचिव झाकिया सुलताना, बांगलादेश शुगर अँड फूड इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनचे अध्यक्ष मोहम्मद आरिफुर रहमान अपू आणि बी कॅशचे मुख्य कार्यकारी अधिकारी कमल कादीर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दोन्ही संस्थांमधील सामंजस्य करारानुसार, बीएसएफआयसीकडील सुमारे एक लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे पेमेंट बीकॅशद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात मिळेल. शेतकरी देशभरात पसरलेल्या ३,३०,०० एजंट पॉईंट्सपैकी कोठुनही कोणतेही शुल्क न घेता पेमेंट केले जाऊ शकेल. यासाठीचे कॅश आऊट चार्ज बीकॅश आणि बांगलादेश शुगर अँड फूड इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन यांच्याकडून समन्वयाने दिला जाईल.
उद्योग सचिव झाकिया सुलताना म्हणाल्या, गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी आपली ऊस बिले बँकेच्या माध्यमातून देण्याची मागणी करत आहेत. ही मागणी आता पूर्ण होईल. तर बीएसएफआयसीसीचे अध्यक्ष मो. आरीपुर रहमान अपू म्हणाले, मोबाईल बँकिंगद्वारे पेमेंटसाठी आम्ही यावर्षी खुली निविदा प्रणाली राबवली. बीकॅशच्या माध्यमातून आम्ही शेतकर्यांना अधिक चांगली सुविधा देऊ शकतो.