दक्षिण आफ्रिकेकडे असलेल्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली काल पार पडलेल्या ब्रिक्स व्यापार मंत्र्याच्या 13 व्या बैठकीला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल आभासी पद्धतीने उपस्थित होते. “ब्रिक्स आणि आफ्रिका : परस्परांतील वेगवान वाढ, शाश्वत विकास आणि समावेशक बहुपक्षीयता यासाठीची भागीदारी” ही यावर्षीची ब्रिक्सची संकल्पना आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी यावेळी बैठकीतील उपस्थितांना संबोधित करताना, जागतिक व्यापार संघटना, पुरवठा साखळी, डिजिटलीकरण, एमएसएमई उद्योग यांच्याशी संबंधित मुद्दे तसेच चुकीची किंमत लावणे आणि अंडर-इनव्हॉईसिंग यांसारख्या समस्यांबाबत विचार मांडले.
ब्रिक्स संघटनेची समानता, खुलेपणा, समावेशकता, सर्वसहमती, परस्परांविषयी आदर आणि समजूतदारपणा या मूल्यांना त्यांनी ठाम पाठींबा दर्शवला.
ब्रिक्स देशांनी परस्परांमध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे यावर भर देऊन गोयल यांनी जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ)सुधारणांच्या दिशेने लहान लहान, साध्य करणे शक्य असलेल्या अग्रेसर पावलांवर दृढ विश्वास व्यक्त केला. डब्ल्यूटीओच्या स्थापनेला तीन दशके पूर्ण होत असताना भारताला उत्साही, सुधारित आणि समावेशक डब्ल्यूटीओची अपेक्षा आहे असे देखील ते म्हणाले. डब्ल्यूटीओच्या ‘30 साठी 30’ या संकल्पनेबाबत त्यांनी सांगितले की ही संकल्पना म्हणजे 1 जानेवारी 2025 ला संघटनेला 30 वर्षे पूर्ण होत असताना डब्ल्यूटीओमध्ये किमान 30 कार्यसंबंधी सुधारणा घडवून आणण्यासाठीचा प्रयत्न आहे असे त्यांनी सांगितले.
ब्रिक्स देशांतर्फे केल्या जाणाऱ्या सामुहिक प्रयत्नांसाठी पारदर्शकता तसेच सामायिक माहितीच्या माध्यमातून विश्वासावर आधारित खुल्या वातावरणात काम करणे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे असे केंद्रीय मंत्री गोयल यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात ब्रिक्स सदस्यतेमध्ये देखील काही सदस्य देशांनी पारदर्शकतेबाबत साशंकता व्यक्त केली आहे याबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी खेद व्यक्त केला .
पुरवठा साखळीबाबत बोलताना, पीयूष गोयल यांनी लवचिक तसेच सशक्त पुरवठा साखळीसाठी सर्वात महत्त्वाचे घटक असलेल्या सुरक्षितता आणि वैविध्य यांच्यासह विश्वास तसेच पारदर्शकता या तत्वांवर अधिक भर दिला.
एमएसएमई उद्योग हा ब्रिक्स सदस्य देशांचा अविभाज्य भाग असल्याचे सांगत केंद्रीय मंत्री गोयल यांनी एमएसएमई उद्योगांसाठी सहकार तसेच सामुहिक प्रयत्न यांचे महत्त्व सर्वांसमोर ठळकपणे मांडले. यासंदर्भात, संशोधन आणि विकास, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि संयुक्त प्रकल्प तसेच भविष्यातल्या संभाव्य भागीदाऱ्यांसाठी व्यापार विकास संधी यांच्या स्वरुपात सहकार्याच्या संधीचा शोध घेणे यांसारख्या महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे असे केंद्रीय मंत्री गोयल यांनी सांगितले.
(Source: PIB)