नवी दिल्ली : देशातील साखर उद्योगाकडून दरवर्षी ४०० कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन केले जाते. हे उत्पादन ८०० कोटी लिटरपर्यंत करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने निश्चित केले आहे. यासाठी जवळपास १७,५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची गरज आहे. त्याशिवाय साखर कारखान्यांकडून उत्पादित केल्या जाणाऱ्या इथेनॉलच्या दरातही सरकारने सुधारणा करण्याची गरज आहे, असे मत इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) चे अध्यक्ष आदित्य झुनझुनवाला यांनी व्यक्त केले.
‘झी बिसनेस’ला दिलेल्या मुलाखतीत अध्यक्ष झुनझुनवाला म्हणाले की, देशातील इथेनॉलची गरज वाढत आहे. केंद्र सरकारने साखर उद्योगाकडून ८०० कोटी लिटर उत्पादनाची अपेक्षा ठेवली आहे. ही अपेक्षा पूर्ण केली जाऊ शकते. त्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज आहे. नव्याने कारखाने उभारले गेले पाहिजेत. तरच वेळेत उद्दिष्ट गाठले जाऊ शकेल.
इथेनॉलसाठी वळवली जाणारी साखर आणि साखरेच्या दरात स्थिरता याबाबत अध्यक्ष झुनझुनवाला म्हणाले की, इथेनॉल उत्पादनासाठी साखर वळविल्यानंतरही देशात साखर टंचाई भासणार नाही. साखरेचा स्टॉक पुरेसा आहे. ‘इस्मा’ आधी साखर उत्पादनाचा, आपल्या ग्राहकांचा विचार करते आणि त्यानंतर इथेनॉल उत्पादन आणि उर्वरीत साखर निर्यात असे धोरण आहे. सध्या आपल्याकडे साखरेचा पुरेसा साठा आहे. पुढील वर्षातील उत्पादनाचे अनुमान आम्ही पाहिले आहेत. आगामी गळीत हंगामातील साखर उत्पादन ३१७ लाख टन असेल, असे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येते. त्यामुळे पुढील वर्षीही पुरेशी साखर उपलब्ध असेल. देशांतर्गत साखरचा खप २७५ लाख टन आहे. त्यामुळे साखरेची टंचाई भासणार नाही.