‘गोडसाखर’मध्ये इथेनॉल प्रकल्प, विस्तारीकरणाला मंजुरी

कोल्हापूर : हरळी (ता. गडहिंग्लज) येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना (गोडसाखर) कार्यस्थळावर इथेनॉल व विस्तारीकरणासाठी बुधवारी (९ ऑगस्ट २०२३) जनसुनावणी आयोजित केली होती. यासाठी सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी इथेनॉल व विस्तारीकरणाला मंजूर.. मंजूरच्या घोषणा दिल्या. अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली यांच्या अध्यक्षतेखाली ही जनसुनावणी पार पडली.

स्वागत प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने यांनी केले. ते म्हणाले, कारखान्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे इथेनॉल प्लांट आणि विस्तारीकरणासह अन्य प्रकल्पांसाठी सविस्तर प्रकल्प सादर केला आहे.  त्यासाठी ही जनसुनावणी आयोजित केली आहे. उपस्थितांकडून येणाऱ्या सूचना, हरकती आणि त्यावर संचालकांकडून दिली जाणारी उत्तरे पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार असून, त्यानंतर यावर निर्णय होणार असल्याचे माने यांनी स्पष्ट केले.

त्यानंतर डॉ. सुब्बाराव एन्वायरमेंट सेंटर ने ‘गोडसाखर’च्या नव्या प्रकल्पांचा आराखडा उपस्थितांसमोर सादर केला. यावर काशिनाथ माने, प्रा.पी.डी.पाटील, शशिकांत चौगुले, रामचंद्र पोवार, साधना आयवळे, अमर कांबळे यांनी मते मांडली. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर म्हणाले कि, नव्या प्रकल्पांमुळे हरळीकरांना कुठलाही त्रास होणार नाही, अशी खात्री दिली. शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि कारखान्याचे विस्तारीकरण हेच आपले धरण असल्याचे डॉ. शहापूरकर यांनी स्पष्ट केले.

या सुनावणीबाबत अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली यांनी मत व्यक्त करताना एवढ्या मोठ्या प्रमाणात सुनावणीसाठी पहिल्यांदाच गर्दी झालेली पाहत असून, यापूर्वी अनेक सुनावण्या केल्या. मात्र, त्या ठिकाणी बरेच वाद-विवाद होताना पाहिले. इथे मात्र शांतपणे मुद्दे मांडत हा प्रकल्प सुरू होण्यासाठीच सर्वांची तळमळ असल्याचे दिसून आल्याचे मत मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here