साखरेची एमएसपी प्रतिक्विंटल ३,७२० रुपये करावी : सहकार मंत्री वळसे-पाटील

पुणे : साखरेचा उत्पादन खर्च वाढल्याने साखरेची एमएसपी प्रतिक्विंटल ३७०० रुपये करण्याची मागणी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केली. राज्यात पावसाने ओढ दिल्याने ऊस गाळप हंगामाची स्थिती गतवर्षाप्रमाणेच यंदाही बिकट राहणार असल्याचे मत मंत्री वळसे-पाटील यांनी व्यक्त केले. साखर कारखान्यांवरील साखर विक्री क्विंटलला ३५०० ते ३५५० रुपये दराने होत असून ही वाढ समाधानकारक आहे. तसेच केंद्राने साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) वाढवून ३,७२० रुपये करावी यासाठी राज्य सरकारही प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.

नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कारखाना महासंघाच्या वतीने मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (व्हीएसआय) आयोजित तांत्रिक चर्चासत्रामध्ये ते बोलत होते. यावेळी व्हीएसआयचे अध्यक्ष शरद पवार संचालक, आ. जयंत पाटील,आ. राजेश टोपे, साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, उद्योजक नरेंद्र मुरकुंबी आदी उपस्थित होते.

वळसे-पाटील म्हणाले, देशात २,२५३ ऊस तोडणी यंत्रे असून त्यापैकी ५३ टक्के म्हणजेच १,१८७ ऊस तोडणी यंत्रे एकट्या महाराष्ट्रात आहेत. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून आणि राज्याचा अनुदान हिस्सा टाकून नुकतेच २०२३-२४ मध्ये ९०० ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदानाचे ३२१ कोटी ३० लाख रुपये उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यासाठी केलेल्या नियमावलीनुसार काम होणार असून साखर आयुक्तालय स्तरावर सुमारे ४ ते ५ हजार अर्ज प्राप्त झालेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here