म्हैसूर, कर्नाटक : ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी १४ ऑगस्ट २०२३ रोजी बन्नूर रोडवरील नव्या उपायुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. साखर कारखान्यांनी ऊसाची प्रती टन १५० रुपये थकबाकी देण्यासह इतर मागण्यांबाबत आंदोलन करण्यात आले. राज्य ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष कुरबुर शांता कुमार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी उपायुक्त कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर चढून आवारात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखले. परिसरात घुसण्यास अयशस्वी ठरलेल्या शेतकऱ्यांनी मुख्य दरवाजा समोर ठिय्या आंदोलन सुरू केले आणि जोरदार घोषणाबाजी केली.
त्यापू्र्वी शांताकुमार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी ललिता महल मैदानापासून नवा उपायुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. उपायुक्त कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर काही शेतकऱ्यांनी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, बंद गेटवर चढणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखले. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी सांगितले की, उपयुक्तांसमवेत अनेक बैठका होऊनही कारखान्यांनी अद्याप १५० रुपये प्रती टन ऊस बिल दिलेले नाही.