सोमेश्वर कारखान्याचे १४ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : अध्यक्ष जगताप

पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा जादा दर दिला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना कार्यरत आहे. गेल्या ८ वर्षांत ‘सोमेश्वर’ ने सरासरी प्रति टन ३१०० रुपये दर दिला आहे. सोमेश्वर कारखान्याने आगामी हंगामात १४ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.

‘सोमेश्वर’ने एफआरपीपेक्षा प्रति टन ५०० रुपये जास्त दर दिल्याबद्दल मुरुम (ता. बारामती) येथे शेतकरी, ग्रामस्थांच्या वतीने संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी जगताप बोलत होते. जगताप म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीमुळे ‘सोमेश्वर’ला जवळपास दोन लाख टन उसाची टंचाई भासण्याची शक्यता आहे. जिरायती भागात ऊस वाळून चालला आहे. अनेक शेतकऱ्यांनी गुऱ्हाळ व जनावरांच्या चाऱ्यासाठी ऊस तोडाला आहे. ऑक्टोबर अखेर किंवा नोव्हेंबरच्या पंधरवड्यात ‘को-जन’ची विस्तारवाढ होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

यावेळी उपाध्यक्ष प्रणिता खोमणे, माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, फत्तेसिंह चव्हाण, नीलेश शिंदे, संदीप सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. मनोहर कदम यांनी केले. यावेळी पोपटराव जगताप, सुनील भगत, लक्ष्मण गोफणे, शैलेश रासकर, ऋषिकेश गायकवाड, मुरुमचे सरपंच नंदकुमार शिंगटे, डॉ. अमोल जगताप, डॉ. राहुल शिंगटे, पी. के. जगताप, कौस्तुभ चव्हाण, प्रदीप कणसे, रमेश जगताप, अजयश्री पतसंस्थेचे चेअरमन माऊली कदम, सोसायटीचे चेअरमन विकास जगताप तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here