बेळगाव : काकतीतील मार्कडेय सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी (दि.२७) मतदान होणार आहे. कारखान्याच्या पंधरा जागांसाठी ५५ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १४ जणांनी अर्ज मागे घेतले आहेत. कारखान्याचे अध्यक्ष अविनाश पोतदार आणि उपाध्यक्ष तानाजी पाटील यांचा एकच पॅनेल उभे करण्याच्या हालचाली सुरु आहेत, पण अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही.
निवडणुकीत सत्ताधारी गटात काही बदल करण्यावरून गेल्या काही दिवसांपासून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. सत्ताधारी गटाच्या पॅनलवर बुधवारी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उर्वरीत उमेदवार कोणता निर्णय घेणार याकडेही सदस्यांचे लक्ष लागून आहे. पॅनेल करून इतर उमेदवारांची माधार घेण्यासाठी मनधरणी सुरु आहे. निवडणुकीत सुमारे तीन हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.