वाराणसी : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चंद्रयान-३ च्या यशानंतर आता आदित्य एल-१ लाँच करणार आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने ही पहिली सौर मोहीम आखली आहे. सौर मोहिमेत सहभागी असलेले आयआयटी-बीएचयूचे भौतिकशास्त्रज्ञ डॉ. अभिषेक श्रीवास्तव यांनी सांगितले की आदित्य एल-१ सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च केली जाऊ शकते. पूर्णपणे स्वदेशी असलेल्या या मोहिमेत हे वाहन प्रक्षेपणानंतर सुमारे चार महिन्यांनी पृथ्वीपासून १.५ दशलक्ष किलोमीटर दूर असलेल्या लॅन्ग्रेस पॉइंट-१ (L-१) या खास ठिकाणी पोहोचेल.
जागरममध्ये प्रकाशित वृत्तानुसार, लॅन्ग्रेस पॉईंटवर पृथ्वी आणि सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती थांबते. त्यामुळे येथील वेधशाळेच्या कार्यासाठी जास्त ऊर्जा लागणार नाही. अंतराळ हवामानातील तज्ज्ञ असलेले डॉ. श्रीवास्तव हे पृथ्वीच्या वातावरणावर सौर किरणोत्सर्ग, अतिनील किरण, क्ष-किरण आणि सौर फ्लेअर्सच्या परिणामांचा अभ्यास करीत आहेत. इस्रोने स्थापन केलेल्या ‘आदित्य एल-१ स्पेस वेदर मॉनिटरिंग अँड प्रेडिक्शन’ समितीचे ते सदस्यदेखील आहेत.
आयआयटी बीएचयूचे भौतिकशास्त्रज्ञ डॉ. बी.बी. करकर हे सौर मोहिमेत सहभागी होणार आहेत. ते सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राची उत्पत्ती, सूर्याच्या चुंबकीय वातावरणाचे भौतिक आणि गतिमान परिणाम यांचा अभ्यास करीत आहेत. पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील L-१ बिंदूवर स्थापन होणारी ही जगातील दुसरी मोहीम आहे. यापूर्वी १९९५ मध्ये युरोपियन स्पेस एजन्सीने सौर आणि हेलिओस्पोरी वेधशाळा पाठवली होती. यापूर्वी अमेरिका, जर्मनी आणि युरोपियन स्पेस एजन्सीने एकूण २२ सूर्य मोहिमा पाठवल्या आहेत.