भारताने पॅराबॉइल्ड राइसवर (उकडा तांदूळ) २० टक्के निर्यात शुल्क लागू केले आहे. शुक्रवारी अर्थ मंत्रालयाने एका अधिसूचनेद्वारे या माहितीस दुजोरा दिला. गैर बासमती सफेद तांदळावर आणि तुकडा तांदळाच्या शिपमेंटवर लागू केलेल्या निर्बंधानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सप्टेंबर २०२२ आमि त्यानंतर गेल्या महिन्यात याची घोषणा करण्यात आली होती. अन्नधान्याच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सरकारने देशांतर्गत किमती स्थिर ठेवणे आणि बाजारातील मालाची आवक वाढवणे यासाठी हे पाऊल उचलले आहे. महागाईच्या वाढत्या दबावाचा यातून सामना करणे शक्य होणार आहे.
मनीकंट्रोल वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, सद्यस्थितीत भारतात पॅराबॉइल्ड तांदळाचा दर ३७-३८ रुपये प्रती किलो आहे. बासमती तांदूळ ९२-९३ रुपये किलो आहे. व्यापाऱ्यांनी सांगितले की, फ्री ऑन बोर्ड पॅराबॉइल्ड तांदळाचा दर ५०० डॉलर प्रती टन आणि बासमतीच तांदळाचा दर १००० डॉलर प्रती टन आहे. जागतीक पॅराबॉइल्ड तांदळाच्या बाजारपेठेत भारताचा हिस्सा २० ते २५ टक्के आहे. तांदळाची घाऊक महागाई जुलैमध्ये वाढून १२.९६ टक्क्यांवर आली आहे. जून महिन्यात ती १२ टक्के होती. तर जुलै २०२२ मध्ये ४.३ टक्के होती. रशिया कालासागर धान्य करारातून बाहेर पडल्यानंतर २० जुलै रोजी सरकारने गैर बासमती सफेद तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध लागू केले आहेत.