कोल्हापूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, खा. शरद पवार यांनी, केंद्र सरकारकडून सप्टेंबरमध्ये साखर निर्यातीवरदेखील निर्बंध लादले जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित केलेल्या स्वाभिमानी निष्ठावंतांच्या निर्धार सभेत पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती होते. केंद्र सरकारने सत्तेचा वापर विरोधकांना त्रास देण्यासाठीच केल्याचा आरोप करत पवार म्हणाले की, देशातील तरुणांच्या हाताला काम नाही. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. जरा कुठे भाव मिळतोय असे वाटत असताना केंद्र सरकारकडून हस्तक्षेप केला जातो. कांद्याला भाव मिळत असताना लगेच निर्यातीवर ४० टक्के कर लावला. आता सप्टेंबरमध्ये साखर निर्यातीवरदेखील निर्बंध लादले जाण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली आहे.
पवार म्हणाले, केंद्र सरकारच्या या धोरणामुळे ऊस उत्पादक शेतकन्यांना पुढील काळात भाव मिळणार नाही. केंद्र सरकारची भूमिका शेतकऱ्यांना अडविण्याची आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचारी पक्ष असल्याचा तसेच या पक्षातील अनेक मंत्री भ्रष्ट असल्याचा आरोप केला. माझी त्याबाबत कसलीही तक्रार नाही. भ्रष्टाचारी लोकांना धडा शिकविलाच पाहिजे. तुम्ही केलेल्या या गंभीर आरोपाची ईडी, इन्कमटॅक्स, सीबीआय या खात्यांमार्फत खुशाल चौकशी करा, असे जाहीर आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शुक्रवारी येथील सभेत दिले.