शामली : यंदा जिल्ह्यातील अप्पर दोआब साखर कारखान्याचा नवा गळीत हंगाम २० ते २५ ऑक्टोबर यांदरम्यान सुरू होणार आहे, अशी माहिती कारखान्याचे युनिट हेड व उपाध्यक्ष सुशील चौधरी यांनी दिली. कारखान्याने शेतकर्यांचे पैसे देण्यासाठी बँकांकडून ४० कोटी रुपयांच्या कर्जांसाठी अर्ज प्रक्रिया केली आहे. कर्ज न मिळाल्यास शामली साखर कारखाना ३१ जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांची उसाची सर्व थकबाकी देईल. कर्ज मिळाल्यास शेतकऱ्यांना लवकरच संपूर्ण रक्कम दिली जाईल, असे ते म्हणाले.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कारखान्याचे युनिट हेड आणि उपाध्यक्ष सुशील चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, कारखान्याची दुरुस्ती होत नसल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. यापूर्वी गळीत हंगामात कारखान्याच्या देखभाल-दुरुस्तीचे बजेट सहा कोटी रुपये होते. यावेळी १३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. नवीन बॉयलर आणि टर्बाईन आणि कारखान्यातील दुरुस्तीसाठी इतर पैसे खर्च केले जातील.
चौधरी म्हणाले की, ऊस वाहतुकीमुळे कोंडीच्या समस्येला तोंड देण्यासाठी साखर कारखान्याने ऊस यार्डचा विस्तार केला आहे. येथे ट्रॅक्टर-ट्रॉली आणि ट्रक उभे केले जातील. तोडणीबाबत शेतकऱ्यांना व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून माहिती देऊ. आधी ऊस आणला जावू नये यासाठी नियोजन केले जाईल. कारखाना गेल्या काही वर्षांपासू साखर विक्री न झाल्याने आणि कमी दरामुळे तोट्यात आहे. गेल्यावर्षी बॉयलर आणि टर्बाईनमधील बिघाडामुळे अतिरिक्त तोटा सहन करावा लागला. यंदा तो भरून काढला जाईल.