सातारा : भारत सरकारच्या खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटच्या (NSI) वतीने धावरवाडी येथील जयवंत शुगर्सला उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ११ ऑक्टोबर २०२३ रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. या पुरस्कारामुळे जयवंत शुगर्सच्या शिरपेचात आणखी एका मानाच्या पुरस्काराचा समावेश झाला आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर येथे ११ व १२ ऑक्टोबर रोजी नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट व उत्तर प्रदेश शुगर मिल्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय परिषद व साखर एक्स्पो’ आयोजित केली आहे. त्यामध्ये या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जयवंत शुगर्सने ऊस उत्पादक शेतकरी, सभासदांचे हित जोपासले आहे. कारखाना व्यवस्थापनाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराला प्राधान्य देत आणि साखर उद्योगातील बदलत्या स्थितीचा अभ्यास करत उत्कृष्ट कामगिरी नोंदविली आहे. जयवंत शुगर्सने अल्पावधीतच साखर उद्योगात भरारी घेत साखरेबरोबर अन्य उपपदार्थांची निर्मिती करत सातत्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी सिद्ध केली आहे. साखर उद्योगाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी जयवंत शुगर्सने केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन, नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटने हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केला आहे. नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक नरेंद्र मोहन यांचे याबाबतचे पत्र कारखान्यास प्राप्त झाले आहे.